मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानात अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला सरकारने फक्त एकाच दिवसाची परवानगी दिली होती. आता मात्र मिळालेल्या माहितीनुसार या आंदोलनाची परवानगी आणखी एका दिवसाने वाढवलेली आहे. असे असातानाच आता मनोज जरांगे यांनी एका दिवसाच्या मुदतवाढीवर तसेच या आंदोनलाच्या पुढच्या दिशेवर महत्त्वाचे भाष्य केले. मराठा समाजाच्या मुलांना त्रास देऊ नये. त्यांना खाण्यासाठी दुकाने चालू ठेवावीत. तसेच पिण्यासाठी पाण्याची सोय करू द्यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली. तसेच एका दिवसाची परवानगी देण्याचा खेळ खेळू नका. मी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. माझं एक मत आहे की असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा खरा डाव खेळावा. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावे. त्यांनी मराठा समाजाचे मन जिंकणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण दिले तर मरेपर्यंत मराठा समाज या सरकारला विसरणार नाही. एक-एक दिवस मदुतवाढ देण्यापेक्षा थेट आरक्षण देऊन टाकावे, असे मत जरांगे यांनी व्यक्त केले.
नाटक का खेळले जात आहे. आंदोलनास परवानगी देणे सरकारच्या हातात आहे. मला गोळ्या घालून मारणेही सरकारच्याच हातात आहे. पोरांना अडवायचं का सोडायचं हेही सरकारच्याच हातात आहे. मराठा समाजाच्या मुलांना त्रास न दिल्यास तेही काहीच करणार नाहीत. मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. पाणी प्यायचीही सोय नाही. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव आहे. तुम्ही इंग्रजांपेक्षाही क्रूर झाले आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.
तसेच, पुढे बोलताना मराठा समाजाची मुले काहीही करणार नाहीत. ते माज घेऊन आलेले नाहीत. ही मुले वेदना घेऊन आले आहेत. मी उपोषण करून मेल्यावर आरक्षण द्या. हरकत नाही. पण मराठा समाजाच्या मुलांसाठी दुकाने बंद ठेवू नका. अन्यथा मग तुमची आमच्याकडे सभा झाली की आम्हीही पाणी बंद करू. दुकानं बंद करू, असा इशाराच जरांगे यांनी सरकारला दिला.
Post a Comment
0 Comments