Type Here to Get Search Results !

लेकीचा पहिला वाढदिवस साजरा झाला आणि इमारत कोसळली, दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

मुंबईजवळील विरारमध्ये राहणारं जोईल कुटुंब मंगळवारी (26 ऑगस्ट) संध्याकाळी आपली लेक उत्कर्षाचा पहिला वाढदिवस साजरा करत होतं.

विरारच्या रमाबाई इमारतीत जोईल कुटुंबियांच्या राहत्या घरी वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं. पहिलाच वाढदिवस असल्याने नातेवाईक, मित्रपरिवार असे अनेक लोक घरी जमले होते. पण रात्री 12 वाजता रमाबाई अपार्टमेंट कोसळली आणि वर्षभराच्या उत्कर्षासह तिच्या आई-वडिलांचा यात मृत्यू झाला.

पावणेबारा वाजताच्या सुमारास अवघ्या काही सेकंदात एकामागोमाग एक मजले अगदी पत्त्यासारखे खाली कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर 9 जण जखमी आहेत.विरार येथील विजय नगर परिसरातील चार मजली रमाबाई अपार्टमेंट 26 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास कोसळली.

या इमारतीत साधारण 12 खोल्या होत्या. यात राहणारी माणसं ढिगाऱ्याखाली अडकली. एनडीआरएफने साधारण 26 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यानंतर शोधकार्य सुरू केलं. जवळपास 35 तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. आतापर्यंत ढिगाऱ्यातून 26 जणांना बाहेर काढण्यात आलं. यात 17 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी आहे. याच इमारतीत जोईल कुटुंबियांनी 26 ऑगस्टच्या संध्याकाळी आपल्या लहान मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला.

परंतु, यानंतर काही तासातच झालेल्या या दुर्घटनेत वर्षभराची उत्कर्षा आणि तिच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. तर तिची आत्या विशाखा जोईल यात गंभीर जखमी झाली असून आयसीयूमध्ये आहे.विरार पश्चिमेला राहणाऱ्या उत्कर्षाची आत्या स्वप्नाली तांबे या सुद्धा वाढदिवसासाठी गेल्या होत्या. त्या घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांना या दुर्घटनेविषयी कळालं आणि त्या घटनास्थळी पोहचल्या. हाॅस्पिटलमधूनही फोन आला. मुलीची (उत्कर्षा) नस धडधडत होती, पण ती नाही वाचली. ती गुदमरली होती. तिची आई तर तेव्हाच गेली होती.

"उत्कर्षाचा पहिलाच वाढदिवस होता. मीही गेले होते. भरपूर लोक आले होते वाढदिवसाला. तिथे बाजूला त्यांनी रुमसुद्धा घेतला होता, तिथे डेकोरेशन केलेलं होतं. मी तेव्हा त्याला बोलले सुद्धा. त्यांच्या लाद्या अक्षरशः खाली होत होत्या. मी त्याला बोलले तुम्ही रुम चेंज करा आणि इथून निघा लवकर."

उत्कर्षाचे वडील विरारमध्येच इलेक्ट्रिशनचं काम करायचे. रेस्क्यू ऑपेरशनच्या शेवटच्या टप्प्यात अगदी 30 तासांनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.


Post a Comment

0 Comments